श्री महालसा मंदिर वरुण्यपुरी ( वेर्णे )
श्री महालसा मंदिर वेर्णे गांवातील जुने म्हार्दोळ या पवित्र स्थानी वसलेले आहे. वर देण्याचे सामर्थ्य
असलेले ते वरुण्यपूर अशी या गावाची ख्याती जुन्या ग्रंथात वर्णन केलेली आढळते. श्री म्हाळसा म्हणजे
लखलखीत, झगझगीत, प्रकाशमान देवी ! समुद्र मंथनानंतर अमृत वितरण प्रसंगी भगवान श्रीविष्णुनी
धारण केलेले विश्वव्यापी न्यायरूप! देवळातील घंटे खाली उभे राहून घेतलेल्या शपथेला कायदेशीर
दर्जा मिळालेली हि न्यायदेवता. वैभवशाली, भव्य-दिव्य व भक्कम कोट असलेल्या या मंदिरात श्री म्हालसेचा निवास होता. तत्कालीन युरोप मध्ये सुद्धा अभावाने आढळेल असे या मंदिराचे वर्णन
स्वतः युरोपियनांनी केलेले आहे. अशाच एका आख्यायिकेनुसार दुपारी तहानेने व्याकूळ झालेल्या गुराख्यांनी देवतेचे ध्यान केले. देवी प्रसन्न झाली व आपल्या पदाघाताने तिने नुपूर तळीला प्रकट
केले असे म्हणतात. उंच पठारावर असूनही बाराही महिले शीतल असा विपुल जलसाठा
बाळगणारे गोव्यातील हे एकमेव स्थान आहे.
जस्टीस याचा मूळ अर्थ ख्रिश्चन मतप्रतिपादन. पोर्तुगीजांच्या अन्यायी राजवटीत सासष्टी
तालुक्यातील या नावाजलेल्या देवालायावर पहिला घाला पडला. साष्टीतील साडेतीनशे देवालयांचा विध्वंस केप्टन दियोगु फेर्नंडीस या क्रूरकर्म्याने ७ मार्च १५६७ रोजी म्हार्दोलाच्या देवळापासून सुरु केला. मोडलेल्या देवालयांच्या जागी चर्च उभारले जाऊ लागले. श्री महालसेच्या पवित्र जागी मात्र
वेगळेच आश्चर्य घडताना दृष्टीस पडू लागले. चर्च सोडाच साधा क्रॉस जरी उभारला तरी एका रात्रीत तो नाहीसा होऊ लागला. पोर्तुगीज घाबरले आणि चारशे वर्षे हे स्थान असेच अबाधित, पवित्र व
मंगल राहिले.
हिंदुत्व हा गोव्याचा स्थायीभाव आहे. साहजिकच गोवा मुक्तीनंतर भाविकांच्या मनात मूळ जागी
मंदिर उभारणीचा विचार प्रबळ होत गेला. माजी मुख्यमंत्री श्रीमती शशिकला काकोडकर, गोवा
संघचालक वै. सर्वोत्तम प्रभुदेसाई, श्री. रामदास सराफ यांनी त्या दिशेने प्रयत्न सुरु केले. गोव्याच्या प्रथेनुसार मूळ देवतेला कौल लावून अनुमती घेण्यात आली. मूळ देवालयाच्या आराखड्यानुसार बांधकामाला प्रारंभ झाला. मंदिर उभारणीचे परमेश्वरी कार्य अडचणीवर मात करीत सफलतेच्या
दिशेने निघाले. आणि १ मे २००५ रोजी शृंगेरी पीठाधीश श्रीमद भारतीतीर्थ स्वामीजींच्या शुभहस्ते मंदिर शिखर कलश प्रतिष्ठापना संपन्न झाली.
गोवा हि मंदिरांची भूमी. या मंदिरामध्ये आणखी एका मंदिराची भर पडावी असा हेतू मंदिराची
उभारणी करताना विश्वस्थ समितीने डोळ्यासमोर ठेवलेला नव्हता. गोव्यातील मंदिर हे विशिष्ट
जातीचे म्हणून ओळखले जाते. श्री महालसा मंदिराचे महाजनपद मात्र सर्वांना खुले करण्याचा
निर्णय घेण्यात आला.केवळ हिंदूच नव्हे तर पवित्रता पाळणारा ख्रिस्ती बांधवही या देवालयाचा सदस्य बनू लागला. पोर्तुगीज इंक्विझिशनच्या अमानुष अत्याचारानंतरही आपले हिंदू संस्कार टिकवून
ठेवणारा इथला ख्रिस्ती समाज आपोआप देवालयाच्या जवळ येऊ लागला. सामाजिक समरसतेचे एक
नवे रूप आकार घेऊ लागले. आज श्री महालसा मंदिर हिंदुत्वाच्या उदात्त प्रकटीकरणाचे आगळे
वेगळे प्रतीक बनले आहे.
श्री महालसा मंदिर समाजाचे मानबिंदू बनावे असा प्रयत्न विश्वस्थ मंडळ करीत आहे. आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची वाटिका, संपन्न गोशाला, वस्तुसंग्रहालय उभारणी, योग केंद्र, संस्कार केंद्र,
कुटुंब कल्याण केंद, धार्मिक- ऐतिहासिक संशोधन केंद्र, सुसज्ज वाचनालय, सेवा केंद्र या व अशा
अनेक समाजाभिमुख आयामांनी मंदिर आदर्श व्हावे असा प्रयत्न करण्यात येत आहे. पवित्र्याच्या
अधिष्ठानावर आधारलेला सांस्कृतिक पर्यटनाचा एक आगळा वेगळा प्रकल्प म्हार्दोळला साकार होत आहे. गोव्याने धनुर्धारी रामाला शांताराम व शस्त्रधारी दुर्गेला शांतादुर्गा बनविले. जिहादी व क्रूसेडी
मानसिकतांना विश्वशांतीच्या दिशेने नेत वसुधैव कुटुंबकमचा भारतीय विश्वसंदेश बलवान करण्याचे हे ऐतिहासिक कार्य आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा