विशेष मुलांची शाळा, डिचोली
१९ डिसेम्बर १९६१ रोजी गोवा पोर्तुगीझांच्या तावडीतून मुक्त झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य गोमंतकात मोकळेपणाने सुरु झाले. स्वयंसेवकांच्या अथक परिश्रमाने शाखा वाढू लागल्या. संघटनेबरोबर समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सेवाभावी संस्थेची स्थापना करण्याचा विचार पुढे आला. त्यातूनच गोवाव्यापी ' केशव सेवा साधना ' या संस्थेचा जन्म झाला. रुग्ण्सेवाकेंद्र, रक्त-गटसूची, फिरता दवाखाना, आपत्ती विमोचन निधीसंकलन अशी कामे हाती घेण्यात आली. शिक्षणाच्या बाबतीत ग्रामीण भागातील मुलांची होणारी गैरसोय पाहून विद्यार्थी वसतिगृहांची स्थापना करण्यात आली. कार्यकर्त्यांच्या नियमित बैठका होऊ लागल्या. हळूहळू केशव सेवा साधनेचे कार्यकर्ते घडू लागले.
डिचोली तालुक्यात अशीच एक बैठक सुरु होती. चर्चा चालू असताना सगळ्यांच्या लक्षात आले कि डिचोली तसेच आजुबाजुच्या तालुक्यामध्ये मोठ्या संख्येत मतीमंद मुले आहेत. या विशेष मुलांसाठी जवळपास शाळा उपलब्ध नाही. एकतर पर्वरी येथील संजय स्कूल किंवा फोंडा येथील लोकविश्वास प्रतिष्ठान शाळा. मुलांना तिकडे नेणे आणणेही तसे कष्टाचे, खर्चाचे व जिकीरीचे. कार्यकर्त्यांच्या मनात विशेष शाळा सुरु करण्याचा विचार आला. प्रारंभिक तयारी म्हणून डिचोली व आजुबाजूच्या गावांमध्ये सर्वेक्षण सुरु करण्यात आले. सर्वेक्षणाचे आलेले इतिवृत्त कार्यकर्त्यांना अस्वस्थ करणारे होते. विशेष शिक्षणाची सोय नसलेली व पुनर्वसनाची गरज असलेली ३०० मुले तिथे होती. समाजाप्रती संवेदनशील असलेले साधनेचे कार्यकर्ते अंतर्मुख झाले.
विशेष शाळा सुरु करण्याचा त्यांनी निश्चय केला. मतिमंदत्व हा रोग नाही. ती एक कायम राहणारी अवस्था आहे. आईवडील, शिक्षक व समाज यांच्या सहकार्याने यांत थोडी सुधारणा होते. मतिमंदत्व असलेली व्यक्ती स्वतःच्या पायावर उभी रहाते. तिचे परावलंबित्व कमी होते. आत्मविश्वासात वाढ होते. विशेष शाळेचे या प्रक्रियेत मोलाचे योगदान असेल. हे एक प्रकारचे उपचारकेंद्र होईल. औषधोपचारा बरोबर मतीमंद मुलांची शारीरिक व मानसिक अवस्था येथे सांभाळली जाईल. प्रशिक्षण देणारा प्रशिक्षित शिक्षक वर्ग या विशाल मानवी जाणीवेतून काम करेल. आत्मीय जिव्हाळा आणि सामाजिक तळमळ यांचे हे प्रतिकबनेल.
डिचोलीतील लोकप्रिय दंतवैद्य डॉ. गुरुप्रसाद कापडी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन समिती स्थापन करण्यात आली. निधी जमू लागला. २००४ मध्ये दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर शाळेची स्थापना करण्यात आली. सौन्स्थेचे एक हितचिंतक श्री. सद्गुरू शेट्ये यांच्या जागेत ११ विद्यार्थ्यांनिशी पहिला वर्ग सुरु झाला. कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला. विशेष विद्यार्थांच्या विद्यादानाचे काम तसे कठीण. या कामाची परिणामकता वाढवायची असेल तर स्वतःची इमारत हवी. शैक्षणिक प्रयोग राबविणे, वैद्यकीय सुविधा पुरविणे, स्वयौंरोजगर प्रशिक्षण केंद्र सुरु करणे, पालक प्रबोधन बैठका आयोजित करणे, स्वाभाविकपणे स्वतंत्र इमारतीचा विचार सुरु झाला.
अथक कार्यश्रम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे कर्तृत्व, अश्राप पिलांचे पालनपोषण करणाऱ्या पालकांचे पालकत्व, आणि संवेदनशील दात्यांचे दानशूर दातृत्व अशी त्रिसूत्री घेऊन संस्थेने वाटचाल सुरु केली. इमारतीचा विचार पुढे येताच जागेची पाहणी सुरु झाली. श्री झांट्ये बंधू पुढे आले आणि २६०० चौ.मी. जागेचे दानपत्र त्यांनी विश्वस्थांच्या हाती दिले. कार्यकर्त्यांना हुरूप आला आणि अल्पावधीत इमारतींची उभारणी सुरु झाली. काही वर्षां पूर्वीसारखा निधी हा आता कठीण विषय उरलेला नाही. मागणारा कार्यकर्ता जर विषयाप्रती प्रामाणिक असेल तर निधी हवा तेवढा उपलब्ध होतो. समाजातील सर्व थरातील लोकांनी वस्तुरूप व रोख देणग्यांचा ओघ सुरु केला. विशेष विद्यालयाची स्वतंत्र इमारत तयार झाली. आज केशव सेवा साधना संचालित ' विशेष शाळा ' स्वतःच्या सुसज्ज वास्तुत सुरु आहे.
मतीमंद मुलांमध्ये विविध पात्रता असतात.
विशेष शाळेचे कार्य म्हणजे या मुलांच्या विशेषता शोधून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास शिकविणे.
शाळेचा प्रशिक्षित शिक्षकवर्ग हे काम आत्मीयतेने करताना दिसतो आहे. स्वतःच्या शरीराची स्वच्छता राखणे, स्वतःची कामे स्वतः करणे, छोट्या छोट्या गोष्टी करावयास लागणे, रस्त्यावरून आत्मविश्वासाने चालणे,
दुकानात जाऊन सामान खरेदी करणे, साधे-सोपे खेळ खेळणे, अक्षर ओळख करवून घेणे, सोप्या वस्तू तयार करणे, करमणुकीच्या कार्यक्रमात भाग घेणे अशी कामे हे विद्यार्थी करीत असतात. शाळेत मुलांना खेळ, व्यायाम शिकविला जातो. प्राणायामाचे प्रशिक्षण दिले जाते. विशेष मुलांच्या शाळेत पालकांची भूमिका खूप महत्वाची असते. यासाठी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते. त्यांना एकूण अभ्यासक्रम व शाळेतील इतर कार्यपद्धती याविषयी माहिती दिली जाते.
पालक शिक्षक समन्वय अंतर्गत प्रशिक्षण, कार्यशाळा घेतल्या जातात.
शाळेत आज २०१०-११ या शैक्षणिक वर्षी १०३ विद्यार्थी आपले शिक्षण घेत आहेत. मुख्याध्यापिका सौ. केतकी खानोलकर सेवाभावी वृत्तीने शाळेच्या प्रशासकीय व अन्य आवश्यक बाबी सांभाळीत आहेत. एकूण कर्मचारी संख्या ३० असून शिक्षकांचा उत्साह व कर्मचारी वर्गाची कार्यातील तत्परता यामुळे शाळा वेगाने वाटचाल करीत आहे. कार्यकारी मंडळाची सक्रियता पाहता येत्या काही कालावधीत संस्था एक आदर्श संस्था म्हणून नावारूपाला येईल यात शक नाही. प.पू. श्रीगुरुजी म्हणाले होते, ' जनतेमध्ये जनार्दन पाहण्याची श्रेष्ठ दृष्टी हीच आमच्या राष्ट्र कल्पनेचे हृदय आहे. या दृष्टीमुळेच समाजाच्या प्रत्येक व्यक्तीमध्ये त्या दिव्य अशा पूर्ण रूपाचा अंश पाहण्याची प्रेरणा आम्हाला मिळते. '
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा